पाऊसगाणे


मी दारी तिष्ठते नजर नभी रूतवून,
न जाणे कधी तू येशील घरी परतून

ओठात कोरड्या अडले शब्द दिवाणे
मी गाईन तरीही माझे पाऊसगाणे

ते शुष्क ढगांचे बेमतलब गडगडणे
बेताल विजांचे बेमुर्वत बडबडणे

मज ठाऊक असती तुझेच सर्व बहाणे
पण ये रे आता ऐकून पाऊसगाणे

जो थेंब मला तू गेल्या साली दिला
पापणी मधे जो वर्षभरी मी जपला

तो थेंब सांडण्या आधी.. आधीच येणे..
गाईन तुला मग माझे पाऊस गाणे.