जाऊ द्या झालं


तू… गन्धर्वाचा सूर, तू.. हृदयीची हुरहूर..
मी घन कोरडा फिरे दिगंती दूर..
जाऊ द्या झालं !!


तू.. फुलपंखी कुजबुज.. अंतरीचे हितगुज..
मी पोटासाठी वाजवितो अलगुज…
जाऊ द्या झालं !!


तू.. स्वर्लोकी अप्सरा.. मुग्ध अभिसरा..
मी पिसाटलेला वारा, मज विवर गुहांचा थारा…
जाऊ द्या झालं !!


तू गुलबाक्षी अबोल.. तू इंद्रधनू विलोल ..
मी बैरागी फाटका, कवडीच्या मोल ..
जाऊ द्या झालं !!


तू मखमालीचे फूल.. घालीशी जगाला भूल..
मी ..मी.. नुसतीच हुलाहूल..
जाऊ द्या झालं !!


मज भीष्मप्रतिज्ञा..संन्याशाचे कूळ..
तू मोहमयी..मधुमती..दु:खाचे मूळ..
जाऊ द्या झालं !!


मी कट्टरपंथी..भजतो मज संप्रदाया..
तू कोमल काया..स्त्री रूपातील माया
मी ..हा..मी..तो.. मी ..असा.. तसा.. कसासा..
तुज पाहुनी चळलो, ढळलो बये जरासा.
जाऊ द्या झालं !!!!!!